पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
रविवारी पाचोर्यात अंनिस ची जिल्हास्तरीय विविध शाखेंची बैठक पाचोरा शहरातील झेरवाल ॲकॅडमी येथे घेण्यात आली. यावेळी डॉक्टर गोराणे यांचे मार्गदर्शन लाभले.
संघटितपणे समाजातील अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे व समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचे खास वैशिष्ट्य आहे. त्यासाठी समाजातील जवळजवळ निम्मा घटक असलेल्या महिला आणि युवांची पुढील पिढी विवेकी घडण्यासाठी या दोन्ही घटकांना अंनिसच्या संघटनात्मक कामात जाणिवपूर्वक जोडून घ्या ,असे आवाहन अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे यांनी कार्यकर्त्यांना केले.
डॉ. गोराणे पुढे म्हणाले की, नरबळी, जात पंचायतीने बहिष्कृत केलेले कुटुंब ,महिला अशा अंधश्रद्धांच्या भयानक घटना दररोज आपणास माध्यमातून वाचायला आणि पाहायला मिळतात.
एवढेच नव्हे तर आपण ज्या शहरात, गावात राहतो त्या ठिकाणी सुद्धा चौकाचौकात शनिवारी किंवा पौर्णिमा -अमावास्येच्या रात्री पूजाविधी केलेले दैवी तोडगे , उतारे त्यासोबत लिंबू, बाहुली, भात, अंडे असे पदार्थ, वस्तू ठेवलेल्या आढळतात. अशा अंधश्रद्धा युक्त कृती आणि घटनांमुळे समाजात सतत अनामिक भीतीचे वातावरण असते. हे टाळण्यासाठी प्रबोधनाबरोबरच सक्षम संघटन असल्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्र अंनिसची संघटनात्मक आणि उपक्रमात्मक रचनाही डॉ. गोराणे यांनी विषद केली.
उपस्थित शाखांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या शाखेच्या मागील चार महिन्यांच्या कामकाजाचा आढावा आणि पुढील चार महिन्यात करायच्या कामकाजाचे नियोजन सादर केले. शाखांनी नियमितपणे साप्ताहिक बैठकांचे आयोजन करणे, कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे, लोकसंवाद वाढवणे, शाळा महाविद्यालयातून वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कार प्रात्यक्षिक सादरीकरणाचे कार्यक्रम सफाईदारपणे सादर करणे यावर भर द्यावा, असे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी व जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मागील ३५ वर्षांपासून महाराष्ट्र अंनिस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करीत आहे. त्यामुळे जनमानसात महाराष्ट्र अंनिसबद्दल प्रचंड विश्वास व नावलौकिक वाढलेला आहे.
त्यानिमित्ताने डिसेंबर मध्ये साडेतीन दशकपूर्तीनिमित्त राज्य अधिवेशन आळंदी येथे होणार असल्याचे राज्य कार्यवाह दिगंबर कटारे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या स्वयंअध्ययन परीक्षांबद्दलही त्यांनी शाखांच्या कार्यकर्त्यांना सविस्तर माहिती दिली. डिसेंबर अखेर शाखांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आणि शिक्षक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला एरंडोल, पारोळा ,अमळनेर, भडगावया शाखांचे कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी केले कार्यक्रमाचे आभार जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे यांनी मानले.